श्रीक्षेत्र जेजुरी, बहुजनांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलस्वामी खंडेरायाची नगरी

jejuri.in विषयी

श्रीक्षेत्र जेजुरीचा खंडोबा अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत, अगदी राजापासून रंकापर्यंत या कुलदैवताच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातात. "देवा तुझी सोन्याची जेजुरी" असे या नगरीला संबोधले जाते, अशा या सुवर्णनगरीमध्ये आम्ही जन्माला आलो हे आमचे महत भाग्य, आम्हाला याचा नक्कीच अभिमान वाटतो. गेले अनेक वर्षे ( दहा ते बारा ) आम्ही संगणकीय महाजालावर वावर करीत असताना जेजुरीविषयी आणि खंडोबाविषयी उत्सुकतेने शोधायचो, परंतु हाती काहीच लागत नव्हते.
श्री.अरुण कोल्हटकरांचा 'जेजुरी' काव्यसंग्रह किंवा अष्टविनायक सहलीमधील जेजुरी भेटीचा उल्लेख याव्यतिरिक्त जेजुरी विषयी अधिक माहिती मिळतच नव्हती. नक्की काय करायला हवे हे ही समजत नव्हते, अशावेळी आमच्या मदतीला धावून आले पत्रकार अमोल मचाले, त्यांनी सुचविले ब्लॉग, सोशल नेटवर्किंग आणि इतर संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्ही जेजुरीविषयी जास्तीत जास्त माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता. मग आमचा पुढचा प्रवास सुरु झाला, जिथे जिथे माहिती लिहिणे आणि पुरविणे शक्य होते तिथे तिथे आम्ही प्रकाशचित्रे, लेख, काव्य, स्तोत्र या माध्यमातून "जेजुरी" जगासमोर आणण्याच्या प्रयत्नात होतो.
२००६ साली पहिल्यांदा जेजुरीविषयी त्रोटक माहिती देणारा पाहिला ब्लॉग लिहिला. आणि तिथून सदैव नवनविन प्रयोग करून जेजुरीचे नाव सर्च इंजिनवर जास्तीत जास्त वेळा कसे येईल यासाठी प्रयत्न सुरु झाले. प्रत्येकाने आपआपल्या परीने काम करून जेजुरी कशा पद्धतीने प्रकाशझोतात आणता येईल हाच ध्यास आमच्या मित्रपरिवाराने घेतला होता. श्री. गिरीश लोकापुरे यांनी संकेतस्थळ निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले, आणि त्याबरोबरच तांत्रिक सहकार्य देऊ केल्याने हा मार्ग सुखकर झाला.www.jejrui.in या परिवारामध्ये अनेकांचा सहभाग आहे आणि ज्ञात अज्ञात व्यक्तींचेही सहकार्य आम्हाला लाभले आहे, त्यासर्वांच्या ऋणात राहणेच आम्हाला आवडेल. श्रीमल्हारी म्हाळसाकांताने हे कार्य आमच्याकडून करून घेतले जे काही चांगले निर्माण झाले ते त्यांच्यामुळेच  आणि ज्याकाही  उणीवा राहिल्या असतील त्या आमच्यामुळेच हे सत्य आहे.
जयमल्हार !!!!!!!